Pune Ganpati Visarjan : पुण्यात देशातील पहिल्या सार्वजनिक गणपतीला भावपूर्ण निरोप

Published : Sep 26, 2026, 07:43 PM IST
Pune Ganpati Visarjan : पुण्यात देशातील पहिल्या सार्वजनिक गणपतीला भावपूर्ण निरोप

सार

ढोल-ताशांचा गजर आणि फुलांच्या उधळणीत पुण्याने देशातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप दिला. शनिवारी पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्यात आली.

मुंबई : ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची उधळण आणि 'मोरया मोरया'च्या गजरात पुण्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला अत्यंत भावपूर्ण निरोप दिला. हा देशातला पहिला सार्वजनिक गणपती मानला जातो. शनिवारी पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी बाप्पाचं विसर्जन झालं. सजवलेल्या 'श्री विघ्नहर्ता रथा'तून बाप्पाची मिरवणूक निघाली होती. बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास या मिरवणुकीला सुरुवात झाली. उत्सवप्रमुख आणि ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन यांनी या रथाचं सारथ्य केलं.

अशी सुरू झाली शाही मिरवणूक

त्याआधी सकाळी साडेसातच्या सुमारास आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते बाप्पाची पूजा आणि आरती झाली. सकाळी ८ वाजता बाप्पाचा रथ श्री गणेश सुवर्णधाम मंदिरातून मंडईतल्या टिळक पुतळ्याकडे निघाला. परंपरेनुसार, पुनीत बालन यांनी पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींना पुष्पहार अर्पण केले.

रात्री पावणेदहाच्या सुमारास ही मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली. तिथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावरचा नगारा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. शिवयोद्धा मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. तर युवा वाद्यपथक, श्रीराम आणि रमणबाग ढोल-ताशा पथकांनी माहोल तयार केला. मिरवणुकीच्या मार्गावर भाविक आणि कार्यकर्त्यांनी रथावर फुलांची उधळण केली. रथावर केलेली 'कोल्ड-फायर'ची रोषणाईही खूप आकर्षक दिसत होती.

शेवटची आरती आणि विसर्जन

पहाटे साडेतीनच्या सुमारास बाप्पाचा रथ टिळक चौकात पोहोचला. तिथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आणि 'मोरया मोरया'चा गजर सुरू होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी बाप्पाची आरती केली. त्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली. पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी पंचाळेश्वर विसर्जन घाटावरील महापालिकेच्या हौदात बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आणि मिरवणुकीची सांगता झाली.

मिरवणूक आणि पुढच्या वर्षीच्या तयारीवर विश्वस्तांची प्रतिक्रिया

या मिरवणुकीबद्दल आणि पुढच्या वर्षीच्या तयारीबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. मिरवणुकीला झालेल्या उशिराबद्दलही त्यांनी भाष्य केलं. "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेळेत आम्ही मिरवणुकीत सहभागी व्हायला तयार होतो, पण काही कारणांमुळे थोडा उशीर झाला. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीत सहभागी झालो. कमीत कमी वेळेत मिरवणूक पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न होता," असं बालन म्हणाले.

“बाप्पाला निरोप दिल्यानंतर साहजिकच थोडं वाईट वाटतंय. पण आम्ही लगेचच नव्या कल्पनांसह पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू करू. हा संपूर्ण गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडल्याबद्दल मी पोलीस प्रशासन, पुणे महानगरपालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो.”

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Duronto Express Stone Pelting : नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसवर दगडफेक, ४ प्रवासी जखमी; पाहा व्हिडिओ
Gadchiroli Floods: छत्तीसगडमधील पावसामुळे गडचिरोलीत पूर, ५२५ जणांना सुरक्षित स्थळी हलवलं