
मुंबई : एक तरुण आपल्या मित्रांसोबत नागपूरहून मुंबईला जात होता. रात्रीच्या वेळी ते ट्रेनमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात अचानक बाहेरून एक मोठा दगड खिडकीवर आदळला. खिडकीची काच फुटून तिचे तुकडे सर्वत्र उडाले आणि यात त्याचे चार मित्र जखमी झाले.
'Aesthete Traveller' नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने दुरांतो एक्सप्रेसमधील या भयानक घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रवाशांचं जेवण सुरू असतानाच अचानक हा प्रकार घडला. धावत्या ट्रेनवर बाहेरून कुणीतरी दगड भिरकावला आणि खिडकीची काच चक्काचूर झाली. काचेचे तुकडे डब्यात उडाल्यामुळे तिथे बसलेले चार जण जखमी झाले.
व्हिडिओच्या पुढच्या भागात या तरुणाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. तो म्हणाला की, ते सर्वजण मुंबईला निघाले होते आणि जेवत असतानाच हा दगड खिडकीवर आदळला. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या बाहेरचं दृश्य आणि त्यानंतर स्टेशनवर पोलीस येऊन तपास करत असल्याचंही पाहायला मिळतं.
व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये या प्रवाशाने भारतीय रेल्वेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या सीटच्या आजूबाजूला लहान मुलं असलेली कुटुंबं बसली होती, असं त्याने सांगितलं. सुदैवाने दगड फक्त खिडकीवर लागला, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीतीही त्याने व्यक्त केली.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांसाठी जबाबदार कुणाला धरायचं, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. धावत्या ट्रेनवर मुद्दाम दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असं अनेकांचं म्हणणं आहे. रेल्वे प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी आणखी ठोस पावलं उचलायला हवीत, अशी मागणी काही युजर्सनी केली.
एका युजरने विचारलं की, अशा घटनांसाठी नेहमी सरकारलाच का दोष दिला जातो? जे लोक हे कृत्य करतात, त्यांना का जाब विचारला जात नाही? दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, सरकार सुरक्षा आणि कायदे कडक करू शकतं, पण लोकांची मानसिकता बदलणं हे अजूनही एक मोठं आव्हान आहे.तिसऱ्या एका युजरने सवाल केला की, अशा घटनांनंतर प्रवाशांच्या सुरक्षेची आणि जबाबदारीची नेमकी हमी कुणी घ्यायची?