
बाजारात मिळणाऱ्या गुळामध्ये केमिकल्स, रंग, आणि फंगसची भिती... पण दोन चुलत बहिणींनी ठरवलं "गूळ शुद्ध हवा!" आणि या विचारातूनच जन्म झाला गुडवर्ल्डचा!
पारंपरिक गूळ नवीन पद्धतीने सादर करत, प्रीती शिंदे आणि सायली शिंदे या महाराष्ट्रातील उद्योजिकांनी 2021 मध्ये ‘गुडवर्ल्ड’ ची स्थापना केली. त्यांनी बाजारात एक अनोखा ट्रेंड आणला 5 ते 10 ग्रॅमचे क्यूब्समध्ये गूळ! सोबत बाळगण्यासाठी सोपा, दैनंदिन चहा किंवा कॉफीसाठी परिपूर्ण, आणि पूर्णपणे नैसर्गिक!
गूळ हे त्यांचं केवळ उत्पादन नव्हतं, ते त्यांचं वारसागत कौशल्य होतं. गेली 40 वर्षं त्यांच्या कुटुंबाने गूळ तयार केला. पण 2014 मध्ये त्यांनी बदल स्वीकारला. जुना प्लांट बंद करून आधुनिक आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या मदतीने गूळ तयार करण्यास सुरुवात केली. न रंग, न सल्फर, न केमिकल केवळ शुद्ध गूळ!
2019 मध्ये त्यांनी 5 ग्रॅमचा गूळ क्यूब बाजारात आणला. आणि 2020 मध्ये दुबईच्या GulFood प्रदर्शनात भाग घेतला. त्यानंतर त्यांच्या उत्पादनांनी 24 देशांमध्ये प्रवेश केला.
12 नैसर्गिक फ्लेवर्स
400 एकर शेती, त्यातील 100-150 एकर खास गुऱ्हाळासाठी
2800+ स्टोअर्समध्ये उपलब्धता
आणि 2024-25 साली अंदाजे 6 ते 7 कोटींची विक्री!
भारताच्या प्रसिद्ध स्टार्टअप शो शार्क टँक इंडियामध्ये, गुडवर्ल्डने जबरदस्त छाप पाडली. अमन गुप्ता यांनी 5% इक्विटीसाठी 50 लाखांची गुंतवणूक केली.
गुडवर्ल्डची ही कहाणी आहे शेतीपासून स्टार्टअपने ग्लोबल ब्रँड बनण्याची. ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या या दोन बहिणींनी सिद्ध केलं की, नाविन्य, शुद्धता आणि जिद्द यांच्या जोरावर जागतिक यश सहज मिळवता येऊ शकतं. गूळात गोडी आहेच, पण 'गुडवर्ल्ड'च्या यशात प्रेरणा देखील आहे!