
मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप केला होता. मात्र, कोकाटेंनी स्पष्ट शब्दांत हा आरोप फेटाळला असून, "संबंधित व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. मी रमी खेळत नव्हतो, युट्यूबवर विधानसभेचं कामकाज पाहत होतो. जाहिरात स्किप करत असतानाचा तो क्षण कुणीतरी व्हिडीओमध्ये पकडला," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
कोकाटेंच्या म्हणण्यानुसार, "वरच्या सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर मी खालच्या सभागृहात काय चाललंय ते पाहण्यासाठी युट्यूबवर गेलो. तेव्हा 'जंगली रमी' या गेमची जाहिरात आली. ती स्किप करत होतो, आणि त्याच वेळी तो १०-१२ सेकंदांचा व्हिडीओ कुणीतरी काढला."
प्रकरणावर भाष्य करताना कोकाटे यांनी रोहित पवारांवर थेट सवाल उचलला. "तुमच्या मोबाईलवरही जंगली रमीच्या जाहिराती येतातच ना? मग तुम्ही खेळता का? रोहित पवार जंगली रमी खेळतो का?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
कोकाटेंनी केवळ स्वतःवरील आरोप फेटाळले नाहीत, तर युट्यूबवरील गेम्सच्या जाहिरातींवर बंदीची मागणीही केली. "अशा प्रकारच्या जाहीराती सभागृहात दिसू नयेत. रमीसारख्या गेम्सच्या जाहिराती रोखल्या पाहिजेत," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
आपल्या भूमिकेवर ठाम राहत कोकाटेंनी सांगितलं, "मी मंत्री झाल्यापासून विरोधक मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत. माझा हेतू स्वच्छ आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक निर्णय घेतले आहेत. कुणीही त्यावर बोट ठेवू शकत नाही."