
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मनोरमा नगर येथील त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी हल्ला केल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी सात राऊंड फायर केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन गोळ्या पूर्णेकर यांच्या वर्मी लागल्या. त्यानंतर पुर्णेकर यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पाच हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या मनोरमा नगर येथील कार्यालयात घुसले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात राऊंड गोळीबार केला. यातील दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी या हत्येमागे ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे असल्याचा दावा केला आहे. राम पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी नीलकंठ इमारतीत राजेंद्र शिंदे आणि काही हल्लेखोरांची बैठक झाल्याचे त्यांनी पाहिले होते. गणपती विसर्जनासाठी जात असताना संबंधित व्यक्ती एकत्र उभ्या असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर त्यांनी आपल्या वडिलांना काहीतरी कट सुरू असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावर वडिलांनी रात्री १० नंतर बाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता, असे राम पूर्णेकर यांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या भाऊ जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी मिनाक्षी शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. काही काळापूर्वी व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत राम पूर्णेकर यांनी, त्यात त्यांच्या वडिलांचे नाव घेण्यात आले होते आणि निवडणुकीनंतर त्यांना संपवण्याची धमकी दिल्याचा दावा केला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तो प्रदीप पूर्णेकर यांचा जुना मित्र असल्याचा दावाही करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी तो कार्यालयात असल्याचे आणि दोन दिवसांपूर्वीही तो पूर्णेकर यांच्यासोबत बराच वेळ बोलल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले.
राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या वडिलांच्या हत्येचा तपास निष्पक्षपणे करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. “माझ्या वडिलांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले,” असे सांगत त्यांनी या प्रकरणात सखोल तपासाची मागणी केली. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तर कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी आणि तपासातूनच सत्य स्पष्ट होणार आहे.