
बीड - गुन्हेगारी, खंडणी, गावगुंडशाही, पीक विमा घोटाळे आणि हत्यांची मालिका यामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्याचा गुन्हेगारी नकाशा दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. ‘बीडचा बिहार झाला का?’ असा सवाल सध्या जनमानसात ऐकू येतो आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने डॅशिंग आणि कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली.
कॉवत यांनी हद्दीत येताच अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आणि काही दिवसांतच कारवायांचे लोण पसरले. मात्र, पोलीस यंत्रणेतीलच एका कर्मचाऱ्याने त्यांच्या बंगल्यात गांजा सेवन केल्याने संपूर्ण पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थानी रात्री ९.३० च्या सुमारास, बाळू बहिरवाळ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला एसपींनी स्वतः गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले. सध्या एसपींच्या बंगल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासह काही काळासाठी गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत. घराची पाहणी करण्यासाठी ते बंगल्यावर गेले असताना हा प्रकार उघड झाला.
दरवाजा ठोठावूनही उघडला न गेल्याने एसपींना संशय आला आणि दरवाजा उघडल्यावर गांजाचा तीव्र वास त्यांना जाणवला. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सूचना देत, बाळूला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले.
चाचणीत गांजाचे सेवन स्पष्ट झाल्यानंतर, त्याच्यावर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील ही घटना नुसतीच खळबळजनक नाही, तर ती बीडमधील पोलीस यंत्रणेमधील अंतर्गत शिस्तभंग आणि ढिसाळ पाळणीतून निर्माण झालेल्या गुन्हेगारीला उघड करते. एसपी नवनीत कॉवत यांच्यासारखे अधिकारी सखोल तपास आणि आक्रमक कारवाया करत असतानाच त्यांच्या स्वतःच्या देखरेखीतील पोलीस कर्मचाऱ्याचा असे गंभीर गैरवर्तन उघड होणे ही संपूर्ण व्यवस्थेचं दुर्दैवी प्रतिबिंब आहे.
पवनचक्की प्रकरणात संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या
खंडणी पॅटर्न, गावगुंडशाहीचा प्रभाव
पीक विमा घोटाळ्यांसारख्या आर्थिक अपघातांची मालिका
या सर्व घटनांत अनेक वेळा पोलीस यंत्रणेवरच माफियांना अभय देण्याचे आरोप झाले आहेत. आरोपी खुलेआम वावरतात आणि तपास अपूर्णच राहतो, असे वारंवार दिसून आले आहे.
बीड बदलतंय, पण यंत्रणेलाच सुधारणेची गरज एसपी नवनीत कॉवत यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये केलेल्या कारवाया कौतुकास्पद आहेत. मात्र, गुन्हेगारांवर कारवाई करण्यापेक्षा आधी, पोलीस यंत्रणेतच स्वच्छता मोहीम राबवणं आवश्यक असल्याचं ही घटना दाखवून देते. प्रशासनाच्या प्रत्येक थरावर शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी निर्माण झाली, तरच बीडसारखे जिल्हे गुन्हेगारीपासून मोकळे होऊ शकतात.