वडिलांच्या हत्येनंतरही डगमगली नाही… वैभवी देशमुखने बारावीत मिळवले ८५% गुण!

Published : May 05, 2025, 03:53 PM IST
Vaibhavi Deshmukh

सार

Vaibhavi Deshmukh HSC Result: वडिलांच्या हत्येनंतरही, वैभवी देशमुखने बारावीत ८५.१३% गुण मिळवत यश संपादिले. आंदोलनासोबत शिक्षणाचा समतोल साधत, तिने सर्वांना प्रेरणा दिली.

बीड: एकीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला… घरात रडणारी आई, लहान भाऊ आणि संपूर्ण गाव हतबुद्ध. पण या सगळ्या अंधारातही वैभवी देशमुखने आपला आत्मविश्वास टिकवला, ध्येयाला धरून राहिली आणि बारावी परीक्षेत ८५.१३% गुण मिळवत झळाळते यश मिळवले!

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. या अमानवी कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हेलावून गेला. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर केवळ वैभवीवरच नव्हे, तर संपूर्ण देशमुख कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले होते.

मात्र, वैभवीने अशा कठीण प्रसंगी हार मानली नाही. वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी म्हणून ती काकांसोबत आंदोलनात सहभागी झाली. आई आणि लहान भावाला सावरण्याची जबाबदारीही तिने खांद्यावर घेतली. परीक्षेचा काळ सुरू असतानाही तिचे आंदोलनासाठी दौरे सुरूच होते. “वडिलांसाठी न्याय मिळेपर्यंत मी लढणारच,” हा तिचा निर्धार आज साऱ्यांना प्रेरणा देणारा ठरतोय.

अखेर आज जेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला, तेव्हा वैभवीच्या मेहनतीचं फळ सर्वांसमोर आलं. ८५.१३% गुण! तिच्या या यशाने संपूर्ण मस्साजोग गाव अभिमानाने भरून आलं. "आज संतोष देशमुख असते, तर मुलीच्या यशाने त्यांचे डोळे पाणावले असते," अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. एकूण ९४.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांची टक्केवारी ८९.५१ इतकी आहे.

वैभवीचा हा संघर्ष, तिची जिद्द आणि धैर्य केवळ परीक्षेपुरते मर्यादित नाही, तर ती आजच्या पिढीसाठी आदर्श ठरत आहे. दुःखातही उभं राहायचं, संघर्षातही शिकायचं आणि शेवटी यश मिळवायचं हेच तिचं शिकवण आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा