
पॅरिस : परदेशात फिरायला गेल्यावर आपल्या देशाची आणि राज्याची प्रतिमा उंचावेल असे वर्तन करणे अपेक्षित असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने नवा वाद निर्माण केला आहे. पॅरिसमधील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर भारतीय पर्यटकांच्या एका गटाने आरडाओरडा करत घोषणाबाजी केल्याने त्यांच्या 'सिव्हिक सेन्स'वर (नागरी शिस्त) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पॅरिसमधील मॉन्टमार्ट्रे (Montmartre) या गजबजलेल्या भागात एक पथकलाकार (Street Performer) आपले सादरीकरण करत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, भारतीय पुरुषांचा एक गट त्या कलाकाराच्या भोवती गोळा झाला आहे. त्यापैकी एकाने त्या कलाकाराच्या खांद्यावर हात ठेवून जोरात "जय महाराष्ट्र", "जय शिवसेना" आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर समूहातील इतर लोकांनीही त्यात सूर मिसळत मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अचानक झालेल्या या आरडाओरड्यामुळे तो पथकलाकार अत्यंत अस्वस्थ झाला. त्याने हातवारे करून त्या पर्यटकांना शांत राहण्याची विनंती केली आणि थांबण्यास सांगितले. मात्र, त्या कलाकाराची अस्वस्थता लक्षात न घेता हा गट काही सेकंद सातत्याने घोषणाबाजी करत राहिला.
हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) वर 'Delhiite_' नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, त्यानंतर नेटकर्यांनी या पर्यटकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "हे अत्यंत घृणास्पद आहे, अशा लोकांना तत्काळ मायदेशी परत पाठवले पाहिजे आणि त्यांच्यावर कायमची बंदी घातली पाहिजे." दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "दुसऱ्या देशात गेल्यावर तिथल्या शिष्टाचाराचे पालन करण्याऐवजी स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. हे वर्तन स्थानिक संस्कृतीचा अपमान करणारे आहे."
भारतीय पर्यटकांच्या बेशिस्त वर्तणुकीची ही पहिलीच वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीमध्ये काही पर्यटकांनी भर बर्फात मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पॅरिसमधील या ताज्या घटनेमुळे "सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रवाद दाखवणे हे शिष्टाचारापेक्षा मोठे आहे का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.