
सावरगाव, बीड: भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य दसरा मेळाव्यात आज पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील सल, वेदना आणि संघर्ष खुलेपणाने बोलून दाखवला. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
विशेष म्हणजे, एकाच मंचावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र दिसले. मेळाव्याच्या आधी धनंजय मुंडेंनी भगवान शास्त्रींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते, तर पंकजा मुंडेंनी भाषण सुरू करण्यापूर्वी मंचावरच आशिर्वाद घेऊन आपले मनोगत मांडायला सुरुवात केली.
“भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला, आता हा मेळावाही तुमच्या हातून हिरावला जाणार का?” असा थेट सवाल करत त्यांनी आपली भीती आणि नाराजी व्यक्त केली. “माझ्या मेळाव्यात संपूर्ण राज्यातून लोक येतात. मी कुणालाही बोलावले नाही, तुम्ही स्वतः आला आहात. मग अशा वेळी गैरवर्तन का? तुम्ही माझी माणसं नाही.” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात सांगितलं, "तुमचं भगवान बाबांवर खरं प्रेम असेल, तर असं वागणं अपेक्षित नाही. हा शोभेचा मेळावा नाही हा फाटक्या माणसांचा, संघर्ष करणाऱ्यांचा आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जपणाऱ्यांचा मेळावा आहे.” शायरीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लड़ने की…" अशा शायरीद्वारे त्यांनी आपल्या संघर्षशील प्रवासाची आठवण करून दिली.
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांची अवस्था पाहून वेदना व्यक्त केल्या. त्यांनी स्पष्ट केलं की, "मी प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने शब्द देते शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. पूर्ण मदत केली जाईल."
पंकजा मुंडेंनी विविध समाजातील लोकांच्या घरांमध्ये जाऊन केलेली मदत उधृत करत सांगितलं, "मी बौद्ध समाजातील व्यक्तीकडे गेले, तर वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजालाही मदत केली यातून जाती गळून पडत आहेत. माणुसकीचं नातं जुळतंय."
भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचा दाखला देत सांगितलं, "दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने जगा. कुणाचे तुकडे उचलू नका. खोटे धंदे करू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतं. भगवान बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत."