NCP Merger : विलिनीकरणानंतर नेतृत्व अजित पवारांकडे देण्याचा निर्णय आमचाच होता – शशिकांत शिंदे यांचा खळबळजनक दावा

Published : Feb 13, 2026, 12:30 PM IST
Sharad Pawar

सार

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना नव्याने वेग आला आहे. Shashikant Shinde यांनी साप्ताहिकातील लेखातून दावा केला की, विलिनीकरणानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व Ajit Pawar यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आधीच ठरला होता.

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान एक मोठा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा दावा समोर आला आहे. एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखातून विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे देण्याचा निर्णय आमचाच होता, असे स्पष्ट केले. या विधानामुळे दोन्ही गटांमधील हालचालींना आणि राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर चर्चांना वेग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी Sunetra Pawar यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी Sharad Pawar यांनी सार्वजनिकरित्या विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

‘दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले’ – शशिकांत शिंदे

साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी नमूद केले की, विलिनीकरणानंतर पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आधीच झाला होता. मात्र त्यांच्या निधनामुळे ते स्वप्न अपूर्ण राहिले. “दादांचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी लेखात म्हटले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनी 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले होते. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणासंदर्भात पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यावर दुसऱ्या गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी खुले आव्हान दिले.

राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणि विलिनीकरणाच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर अजित पवार गटातील नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक