
नंदुरबार : अल्पवयीन मुलांचं, तसंच तरुणांचं लैंगिक शोषण करुन त्याचे व्हिडिओ, फोटो तयार केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तरुणाचा मोबाईल फोन जप्त केला. यावेळी त्याच्या फोनमध्ये तब्बल ३०० व्हिडिओ क्लिप आणि फोटो आढळले. याप्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.
२०२२ पासून करायचा तरुण, अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय चेतन कोळी हा आरोपी तरुण २०२२ पासून अल्पवयीन मुलं आणि त्याच्याच वयाचे समवयस्क तरुण यांना टार्गेट करायचा. त्यांना पैशांचं आमिष दाखवून लैंगिक शोषण करायचा. इतकंच नाही, तर तो याचे व्हिडिओ आणि फोटो फोनमध्ये काढायचा. त्यानंतर याच फोटो आणि व्हिडिओद्वारे तो पीडितांना धमकी देत होता. सोशल मीडियावर हे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्यावर दबाब टाकत होता.
आरोपी तरुणाला पोलिसांनी कसं पकडलं?
मागील अनेक दिवसांपासून गैरकृत्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी चौकशी आणि मागोवा काढत पाळत ठेवण्यात आली. ६ ऑगस्ट रोजी आरोपी एका अल्पवयीन मुलाला भेटणार असल्याचं पोलिसांना समजलं. आरोपी शहरातील भोणे फाटा परिसरातील शेतात अल्पवयीन मुलाला भेटण्याचं समजलं होतं. त्याचवेळी पोलिसांच्या विशेष पथकाने घटनास्थळी जात तरुणाला ताब्यात घेतलं.
१२ ऑगस्टपर्यंत तरुणाला पोलीस कोठडी
तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा फोन कायदेशीररित्या तपासण्यात आला. त्यावेळी फोनमध्ये अल्पवयीन मुलं, तरुणांशी संबंधीत लैंगिक शोषणाचे व्हिडिओ, फोटो आढळले. दरम्यान, आरोपीविरोधात पॉस्कोअंतर्गत तसंच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे. तसंच पीडितांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेप्रकरणी शहरात संताप व्यक्त होत असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.