
मुंबई: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारावेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी असल्यामुळेच त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप पटोले यांनी केला आहे. मुंबईत महाराष्ट्र बार कौन्सिलतर्फे झालेल्या सत्कारावेळी गवई यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्तांना प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
पटोले यांनी विधान भवनातील आगीच्या घटनेवरूनही सरकारला धारेवर धरले. "महाराष्ट्रालाच आग लागली आहे, त्यामुळे विधान भवनाचा प्रश्नही गंभीर आहे," असे ते म्हणाले. सरन्यायाधीश गवई यांच्या अपमानाबद्दल बोलताना ते म्हणाले, "काल सरन्यायाधीशांचा जो अवमान झाला आहे, तो चिंताजनक आहे. महाराष्ट्र विकायला काढला आहे, हे महाराष्ट्राची अब्रू काढायला लागले आहेत. सरकार यावर कारवाई करणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "सरन्यायाधीश हे आंबेडकरी आहेत, म्हणूनच त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे," असा आरोपही त्यांनी केला.
पटोले यांनी 'फुले' चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी केली. "महाराष्ट्रात 'फुले' चित्रपट करमुक्त केला पाहिजे, तरच हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे आहेत, असे म्हणता येईल," असे ते म्हणाले.
सरन्यायाधीश गवई यांच्या सत्काराला राज्याच्या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. याबद्दल गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
बीडमधील मारहाणीच्या घटनांवरूनही पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली. "अजित पवार दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत, सध्या बीड आणि पुण्यात काय सुरू आहे? ते पालकमंत्री झाल्यानंतर माफियांचे राज्य सुरू झाले आहे," असा आरोप त्यांनी केला. "मी आज काही फोटो पाहत होतो, त्यात तिरंगा आहे, मात्र त्यात अशोक चक्र नाही. या रॅलीतून तिरंग्याचा अपमान ते करत नाहीत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "भारताचे सैनिक कधीही हे सहन करणार नाहीत, देशाच्या सैन्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला आहे," असा आरोपही त्यांनी केला.