वाघ्याच्या समाधीवरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक; म्हणाले, 'लवकरच निर्णय घ्या!'

Published : May 19, 2025, 07:19 PM IST
sambhajiraje chhatrapati

सार

छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी हटवण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. ते म्हणाले की, वाघ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही आणि त्यांच्या समाधीशेजारी वाघ्याची समाधी असणे हे चुकीचे आहे. 

रायगड: रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू असलेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी या समाधीला विरोध करत ती हटवण्याची मागणी कायम ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला पत्रही पाठवले होते. आता पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना संभाजीराजे या मुद्यावर अधिक आक्रमक झाले असून, कायद्याच्या मार्गाने समाधी हटवण्याची मागणी करत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल सांगितले आहे आणि जनजागृतीही केली आहे. वाघ्या कुत्र्याचा आणि किल्ले रायगडचा काहीही संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी त्याच उंचीची समाधी असणे हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली होती, त्यामुळे त्यांचे नाव तिथे सोनेरी अक्षरात कोरले गेले पाहिजे. वाघ्याच्या समाधीसाठी त्यांनी कोणतीही मदत केलेली नाही, ही केवळ दंतकथा आहे."

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी ज्यांनी मदत केली, त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून मी याची जबाबदारी घेणार आहे. हा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितला असून, त्यांनाही तो पटला आहे. लवकरच ते याबाबत समिती स्थापन करतील. त्या समितीत डाव्या, उजव्या आणि सर्व आघाडीच्या लोकांना घेण्याची विनंती आम्ही केली आहे," असेही संभाजीराजेंनी सांगितले.

वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. "कुठलाही कायदा हातात घेण्याचा आमचा विचार नाही. आम्ही हा मुद्दा मांडल्यानंतर काही लोक वाघ्याच्या समाधीबद्दल बोलू लागले आहेत. मीही हेच सांगतो की वाघ्याचा इतिहासात कोणताही संबंध नाही. तुकोजी होळकर महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशी खरा संबंध आहे, म्हणून त्यांचे नाव सोनेरी अक्षरात कोरले पाहिजे," असे ते पुढे म्हणाले.

संभाजीराजे यांनी जोर देऊन सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी योगदान देणारे फार कमी लोक होते. राजर्षी शाहू महाराजांनीही रायगडच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले होते, त्याचप्रमाणे होळकर महाराजांनीही मदत केली होती. "आता वाघ्याची समाधी हटवण्याच्या विरोधात जे कोणी असतील, त्यांना समोर बोलवा, मी त्यांना पुरावे देण्यास तयार आहे. कारण एकाही इतिहासकाराने वाघ्याचा इतिहासात उल्लेख केलेला नाही," असे आव्हानही त्यांनी दिले.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!