
नागपूर - भारतीय वायुदलाने अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत संवेदनशील मोहिमेमध्ये नागरी वस्त्यांना हानी न पोहोचवता फक्त दहशतवाद्यांचे कॅम्प्स लक्ष्य करून एक उल्लेखनीय यश मिळवलं आहे. या मोहिमेतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे ‘एलएमएस’ लॉईटरिंग म्युनिशन्स सिस्टम चा वापर, आणि हे स्वदेशी तंत्रज्ञान मिळालंय नागपूरमधून येथून. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील एक नवे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सोलार इंडस्ट्रीजकडून ते विकसित करण्यात आलंय.
दहशतवादी गटांनी नागरी भागांमध्ये लपून बसण्याचे प्रकार वाढत असताना, अशा भागांमध्ये कोणताही collateral damage (सहाय्यक हानी) न करता फक्त विशिष्ट टार्गेट उडवणे हे मोठं आव्हान ठरतं. याचसाठी भारतीय वायुदलाने ‘एलएमएस’चा वापर करत अत्यंत अचूकपणे लक्ष्यांचा नाश केला.
विशेष म्हणजे ही प्रणाली ‘कामिकाझे ड्रोन्स’ म्हणूनही ओळखली जाते, म्हणजेच हे ड्रोन्स लक्ष्यावर आदळून स्फोट घडवतात. परंतु या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे आज प्रत्यक्ष सैनिकांच्या जीवितास धोका न देता अधिक प्रभावी कारवाया शक्य झाल्या आहेत.
नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या ‘नागास्त्र-१’ या एलएमएस प्रणालीचा वापर या ऑपरेशनमध्ये झाल्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्रालयाने गोपनीयतेच्या कारणास्तव अधिकृत माहिती दिलेली नसली, तरी हे संकेत लक्षणीय आहेत.
३० किमी रेंज, इलेक्ट्रिक प्रोपल्शन, कमी आवाजामुळे शत्रूला गतीचा अंदाज लागत नाही.
दिवसा आणि रात्री वापरासाठी सक्षम कॅमेरे.
स्वदेशी साहित्याचा मोठा वापर.
१.५ किलो पर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता.
पॅराशूट रिकव्हरी सिस्टम मुळे मोहीम रद्द झाली तरी ड्रोन सुरक्षित परतवता येतो.
२०२४ मध्ये भारतीय लष्कराने नागास्त्र-१ च्या ४०० युनिट्स खरेदीसाठी करार केला होता. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत तयार झालेलं हे ड्रोन फक्त तांत्रिकदृष्ट्या सक्षमच नाही, तर भारताच्या संरक्षण स्वावलंबनाचं प्रतीकही ठरतंय.
ऑपरेशन सिंदूरने एक बाब स्पष्ट केली आहे – युद्ध आता फक्त रणभूमीवर न राहता तंत्रज्ञानावर आधारित रणनीतींचा भाग होत आहे. अशा वेळी स्थानीय उद्योगांचे संरक्षणात योगदान हे भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत मोलाचं ठरत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक कारवाई नसून भारतीय संरक्षण यंत्रणांची आधुनिक वाटचाल आणि स्वदेशी सामर्थ्याची घोषणा आहे. नागपूरसारख्या शहरातून तयार होणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भारत आता अधिक सुरक्षित आणि सामर्थ्यशाली बनतो आहे. नागास्त्र-१ फक्त एक ड्रोन नाही, तर भारताच्या सामरिक स्वावलंबनाची गाथा आहे.