
मुंबई : मुंबई आणि दक्षिण कोकणाला जोडणारी बहुप्रतीक्षित मुंबई-सावंतवाडी दैनिक एक्स्प्रेस आज, 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून या सेवेचा शुभारंभ होणार असून, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीला मुंबईहून थेट दररोज रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी 12.50 वाजता उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनाची विशेष ट्रेन क्रमांक 01001 गुरुवारी दुपारी 12.50 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ यांसह विविध स्थानकांवर थांबा असेल.
मध्य रेल्वेच्या मते, या नव्या सेवेमुळे व्यापारी, पर्यटक आणि कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सावंतवाडी, आंबोली, तारकर्ली तसेच गोवा सीमेवरील पर्यटनस्थळांना जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
नव्या एक्स्प्रेसमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल श्रेणीतील डबे असतील. ट्रेनमध्ये 1 AC First Class, 2 AC 2-Tier, 3 AC 3-Tier, 4 स्लीपर आणि 4 जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश आहे. तर मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या इतर गाड्यांवरील गर्दी कमी करण्यासही या सेवेची मदत होण्याची शक्यता आहे. नियमित दैनिक सेवेचे वेळापत्रक आणि इतर तपशील मध्य रेल्वेकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.