
Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात बदल झाला असून विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात अतिृष्टीचा इशारा
राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. मुंबईच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात पावसाचा जोर अधिक आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कुठे तरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल
राज्यात सर्वत्र मान्सनू दाखल झाला आहे. विदर्भाच्या काही भागात मान्सून दाखल झाला नव्हता. मात्र हवामान खात्याकडून (IMD) नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 16 जून होती. मात्र, 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झाला आहे. केरळनंतर मान्सून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात यापूर्वीच दाखल झाला होता. आता विदर्भातही मान्सून दाखल झाला आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीकामांना देखील वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली आहे.