Maratha Reservation: ५८ लाख नोंदींचा मुद्दा पुन्हा पेटला; जरांगे पाटील आजपासून उपोषणावर

Published : Aug 29, 2026, 12:08 PM IST
jarange

सार

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. ५८ लाख नोंदींच्या आधारे पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ५८ लाख नोंदींच्या आधारे सर्व पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच जात पडताळणीमध्ये नाकारण्यात आलेल्या प्रमाणपत्रांबाबतही योग्य निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसणार आहेत. हे आपले ११ वे उपोषण आहे असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. याशिवाय आताच्या आंदोलनाला त्यांनी अंतिम लढ्याचे स्वरूप दिले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत.

सरकारकडून नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत स्पष्टीकरण

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ५८ लाख नोंदींपैकी केवळ ०.३ टक्के नोंदी नाकारण्यात आल्या आहेत. पण ज्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केले आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ज्यांच्याकडे नोंदी आहेत आणि सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यांनी पुढील आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.

जरांगे पाटील मागण्यांवर ठाम

सरकारकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण असूनही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला आहे. ५८ लाख नोंदींमध्ये समाविष्ट असलेल्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. जात पडताळणी समितीकडून नाकारण्यात आलेल्या काही प्रमाणपत्रांबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणांपैकी काही बाबी न्यायालयात गेल्याने त्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

१४ लाखांहून अधिक प्रमाणपत्रे दिल्याचा सरकारचा दावा

सरकारने जरांगे पाटील यांना दिलेल्या आकडेवारीनुसार, २४ ऑगस्टपर्यंत कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या १४,३१,६३४ व्यक्तींपैकी १४,२४,६३४ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. राज्यात १७४७ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र ५२४८ अर्ज नामंजूर झाल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, केवळ अर्ज केलेल्यांनाच नव्हे तर ५८ लाख नोंदींमध्ये पात्र ठरणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र मिळावे, असा जरांगे पाटील यांचा आग्रह आहे.

अंतरवाली सराटीत आंदोलनाची मोठी तयारी

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या उपोषणासाठी मराठा संघटनांकडून मोठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून शनिवारी हजार रिक्षांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्ते रिक्षांसह अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. मोठ्या संख्येने वाहने एकाच वेळी या परिसरात दाखल झाल्यास वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र

एकीकडे सरकारकडून प्रमाणपत्र वितरणाची आकडेवारी आणि अर्ज करण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे ५८ लाख नोंदींच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उपोषणाकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर
MPSC पेपरफुटीची चौकशी होणार, दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती