आताच्या राजकारणात मनोज जरांगे हे नाव चर्चेत राहत असून त्यांनी उमेदवार उभे करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार कुठून उभे राहणार याबद्दलची माहिती लवकरच देणार असल्याची सांगितली आहे. निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख असून आज कोणते उमेदवार माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे -
“तुम्ही जितकं नेत्याचं ऐकून द्वेषाचं काम करायचा प्रयत्न करतात, तितकं तुम्ही समाजाला दु:खात डुबवायला लागला आहात. हा समाज बलशाली बनवायचा आहे. त्यासाठी ज्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, लेकरांचं भविष्य फोडलं, आमच्या लेकरांची मान कापण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाला हिणवलं, हिन वागणूक दिली, टार्गेट केलं गेलं, त्या सत्ताधाऱ्यांनाही मी सोडणार नाही. कारण त्यांच्या इतक्या वेदना उभ्या आयुष्यात माझ्या समाजाला कुणी दिल्या नसतील. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. त्या समाजाला संपविणाऱ्याला मी संपविल्याशिवाय शांत राहणार नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे झाले भावुक -
“जिथे ताकद नाही तिथे पाडणार आहोत. मला या प्रवाहात यायचं नव्हतं. राजकारण माझा पिंड नाही. पण या हरामखोरांनी माझ्या समाजाला एवढं दु:ख दिलं, आज खूप पोरांवर केसेस झाल्या आहेत, माझ्या समाजाचं बलिदान गेलं आहे. त्या आईच्या कपाळावर कुंकूच नाही. ते बघताना एवढा कासाविस जीव होतो की, असं वाटतं मराठाच्या पोटी जन्म घेऊन आपण काहीच करु शकत नाही. एवढा मोठा बलाढ्य समाज आहे, आणि आईच्या डोळ्यांतील पाणी थांबत नाही, तिला ना नवरा दिसत नाही, छोटे-छोटे लेकरं घेऊन जायचे कुठे? हे सरकार आमची इतकी चेष्टा करतंय, आमचा मराठा समाज 15 महिन्यांपासून रस्त्यावर आहे, माझ्या समाजावर खुन्नस देऊन आरक्षणच देत नाहीत, मी मराठा समाजाचा खांदानी पोरगं आहे तर मी का बदला घेऊ नये?” असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.