
Maharashtra ZP–Panchayat Samiti Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026) मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 731 जिल्हा परिषद आणि 1,462 पंचायत समिती जागांसाठी झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये पार पडल्या होत्या. एकूण 7,438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शनिवारी मतदान झाले असून आज विविध मतमोजणी केंद्रांवर निकाल जाहीर होत आहेत.
राज्यातील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी दुपारी 1 वाजेपर्यंत 485 जागांचा कल हाती आला आहे. त्यानुसार महायुतीतील पक्षांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे.
या आकडेवारीनुसार महायुती सत्तेकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.
कोकण विभागात महायुतीने मोठी आघाडी घेतली असून तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागांचा समावेश आहे.
50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीत भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातूनही शिवसेना (शिंदे गट) चे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. महाड पंचायत समितीमध्ये सवाने-धामणे गणातून अनिल जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांचा विजय निश्चित झाला आहे.