Maharashtra Winter Update : मुंबईत पहाटे दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली असून अपघातांचा धोका वाढला आहे, तर पुण्यात वाढते प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
राज्यासह मुंबई, उपनगर आणि पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर, वाढती थंडी आणि पुण्यात वाढलेले हवेतील प्रदूषण नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास थंडी कायम राहण्याचा इशारा दिला असून, वाहनचालक आणि नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
25
मुंबईत पहाटे दाट धुके, दृश्यमानता घटली
मुंबई आणि उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पसरलेले पाहायला मिळत आहे. विशेषतः सकाळी ५ ते ९ या वेळेत रस्ते आणि महामार्गांवर दृश्यमानता (Visibility) मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. धुक्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
35
पुण्यात हवेतील प्रदूषण धोक्याच्या पातळीवर
पुणे शहरात गेल्या आठ दिवसांत हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. हिवाळ्यातील मंद वारे, वाढते बांधकाम प्रकल्प आणि वाहनांची संख्या यामुळे प्रदूषणाचे कण हवेतच साचून राहत आहेत. शहरातील अनेक भागांत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १८० च्या पुढे गेला असून ही पातळी आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते. नागरिकांनी शांत बसतानाही दम लागणे, डोळ्यांची जळजळ आणि घशात खवखव जाणवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. सकाळ-संध्याकाळ पुणे शहरावर धुराचे लोट आणि धुक्याचे मिश्रण स्पष्टपणे दिसून येत आहे.
हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, याचा परिणाम शेती आणि पिकांवर होऊ शकतो.
55
नागरिकांसाठी काळजीचा इशारा
थंडी, धुके आणि प्रदूषण या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. सकाळी लवकर बाहेर पडताना मास्क वापरणे, वाहन चालवताना हेडलाईट्स वापरणे आणि गरज नसल्यास प्रवास टाळणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.