Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक, 24 जूननंतर दिलासा मिळण्याची शक्यता

Published : Jun 19, 2026, 08:10 AM IST
Maharashtra Weather Update

सार

Maharashtra Weather Update : दक्षिण कोकणात 8 जूनला दाखल झालेला नैऋत्य मोसमी वारा महाराष्ट्राच्या उर्वरित भागात अद्याप पुढे सरकलेला नाही. अशातच हवामान विभागाने राज्यात कधी पावसाच्या सरी बसरणार याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मॉन्सूनच्या आगमनासाठी नागरिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक असे वातावरण अद्याप तयार झालेले नाही. यामुळे पुढील चार-पाच दिवसांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, येत्या 24-25 जूनच्या दरम्यान कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

8 जूननंतर मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर मॉन्सूनच्या पुढील प्रगतीला ब्रेक लागला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार होत नसल्याने पावसाला विलंब होत असल्याचे, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्रातून येणारा आर्द्रतेचा प्रवाह मंदावला

सध्या अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्येकडील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने किनारपट्टी आणि अंतर्गत भागांकडे जाणाऱ्या बाष्पाचे प्रमाण घटले आहे. या आर्द्रतेमुळे पावसाचा विस्तार वाढला जातो आणि मॉन्सूनच्या प्रगतीला गती मिळते. मात्र, सध्या हा प्रवाह मंदावल्याने मान्सून सक्रिय होण्यास वेळ लागत असल्याचे हवामान खात्याने म्हटलेय.

देशात सरासरीपेक्षा 41 टक्के कमी पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 4 जून ते 18 जून या कालावधीत देशात सरासरीपेक्षा 41 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत 72.2 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 42.6 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे.

कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव

मान्सूनला गती देण्यासाठी आवश्यक असलेले कमी दाबाचे क्षेत्र, चक्राकार वाऱ्यांची स्थिती किंवा पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा सध्या निर्माण झालेला नाही. याशिवाय, मॅडन ज्युलियन ऑसिलेशन (Madden–Julian oscillation) सारखे व्यापक वातावरणीय घटकही सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे हवामान खात्याकडून हवामानात होणाऱ्या बदलांकडे सातत्याने लक्ष ठेवून आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक