शरद पवार गटाने तटकरेंचा 'तो' व्हिडिओ केला शेअर, काय आहे व्हिडिओत जाणून घ्या

अजित पवार यांनी आपण वेश बदलून दिल्लीला जात नव्हतो अशी भूमिका घेतली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Aug 3, 2024 9:12 AM IST / Updated: Aug 03 2024, 02:46 PM IST

गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सत्तेत सामील होण्याआधी वेष बदलून दिल्लीला जात होते, त्यांनी नाव बदलून विमानाने प्रवास केल्याच्या चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाल्या आहेत. या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विमानात वेश बदलून नाव बदलून जाण्याची परवानगी कशी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. यावर अजित पवारांनी शुक्रवारी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी मी वेश बदलून गेलो त्याचे पुरावे दाखवा जर ते खरं असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेतो आणि पुरावे नसतील तर ज्यांनी आरोप केले त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं असंही अजित पवारांनी म्हटलं होतं अशातच शरद पवार यांच्या पक्षाने एक व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल केला आहे.

शरद पवार गटाने व्हिडिओ शेअर करत केला हल्लाबोल

एकीकडे अजित पवार यांनी आपण वेश बदलून दिल्लीला जात नव्हतो अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये अजित पवार आले होते त्यांची आणि दिल्लीतल्या पत्रकारांची अनौपचारिक चर्चा देखील झाली आणि यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या चर्चेबाबत उल्लेख केला आहे. या व्हिडिओसोबत शरद पवार गटाने "हम तो डूबेंगे ही "दादा" तुम्हें भी ले डूबेंगे..!! बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा..!!" अशा पध्दतीचे कॅप्शन देखील दिले आहे.

 

 

सुनील तटकरे व्हिडिओमध्ये काय म्हणाले?

शुक्रवारी दिवसभर अजितदादा दिल्लीमध्ये होते. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागाकडे ते आपले वेगवेगळे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. त्यांच्या शासकीय बैठका संपल्या नंतर ते माझ्या निवासस्थानी होते. तेव्हा दिल्लीतील पत्रकार मित्रांनी मला विनंती केली दादांशी चर्चा व्हावी. माझ्या विनंतीनंतर दादांनी मान्यता दिली. पत्रकारांशी तासभर गप्पा झाल्या. त्यामध्ये दादांनी त्यांच्याशी खेळीमेळीत चर्चा केली. त्यांचा सर्व तपशील चर्चा सुरू आहे. त्यावर तटकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दिल्लीत पत्रकार मित्रांशी दादा बोलले त्यांच्याकडून मास्क आणि बाकीच्या गोष्टीचा तपशील घ्या. दादा त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सांगितलं त्यांच्याकडून माहिती घ्या असंही यावेळी तटकरे म्हणालेत.

वेश बदलून गेल्याच्या टीकेवर अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया

मी नाव आणि वेश बदलून प्रवास केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मी कधीही वेश बदलून प्रवास केला नाही. माझ्याबाबत चाललेल्या चर्चा धादांत खोट्या आहेत. याबाबत बोलताना आधी माहिती तरी घ्यावी. गेल्या ३५ वर्षात मी राज्याचा आमदार राहिलो, खासदार होतो, अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलो आहे, मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो, मला माझी जबाबदारी कळते. एखाद्याने आपलं नाव बदलून जाणं हा देखील गुन्हा आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले. त्यामध्ये काहीही तथ्य नाही असं आज अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.

सकाळचा नऊचा भोंगा वाजतो त्यांनी पण म्हटले अजित पवारांनी असे केले, मी काहीही केले नाही. मी नाव, वेश बदलून कुठेही गेलो नाही, त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? मला समाज ओळखतो, जर मी वेश बदलून आणि नाव बदलून गेलो ते सिध्द झाले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. नाही सिध्द झाले तर ज्या लोकांनी संसदेपासून राज्यापर्यंत माझ्यावर आरोप केले त्यांनी निवृत्ती घ्यावी असे आव्हान नाव न घेता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना केले आहे. तर मी कोणत्या विमानातून गेलो, कोणी मला पाहिले, मला कुठं जायचे असेल तर मी उजळ माथ्याने जाईन, मला लपून छपून राजकारण करण्याची गरज नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या महायुतीतील सहभागाबाबतचा किस्सा सांगितला. दिल्लीत पत्रकारांसोबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अजित पवार यांचा गप्पांचा फड रंगला होता. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्यापूर्वी काय-काय आणि कसं-कसं जुळवून आणलं? याबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले.

अजित पवार यांच्या वेशांतराची इन्साईड स्टोरी

मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये कशी सहभागी झाली? याबद्दलचे खुलासे केले. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा :

'...तर मी राजकारण सोडेन', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान

 

Share this article