Maharashtra Rain Update : राज्यात कोसळधार पावसाचा हाहाकार! पुरात कार गेली वाहून, भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Maharashtra Rain Update : बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान या नदीत कार अक्षरशः डोळ्यादेखत वाहून नेलीय.

Rameshwar Gavhane | Published : Jul 8, 2024 9:29 AM IST

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या पावसाचा फटका रेल्वे, रस्ता आणि हवाई वाहतुकीवर देखील झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या उशीराने प्रवास करत आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले आहे. अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सुटाळा गावात कार गेली वाहून

बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही नदी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने खळखळायला लागली आहे. दरम्यान या नदीच्या कडेला उभी असलेली एक चार चाकी इन्होवा कार अक्षरशः डोळ्यादेखत नदीच्या पाण्याने वाहून नेलीय. नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणीही बसलेले नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चारचाकी वाहनाच्या बरोबरीने वाहून गेले आहे.

विदर्भातील नदी नाल्याला पुराचे स्वरूप

बुलढाणा जिल्ह्याप्रमाणेच अकोल्यातही गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन पार विस्कळीत केले आहे. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अकोल्यातल्या अनेक रस्त्याला नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यातच बाळापूर तालुक्यातल्या मन नदीला देखील पूर आलाय. रस्त्यावरील पाणी नदीत जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.

याच दरम्यान बाळापूर येथील रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यात दुचाकी वाहून जात असताना काही लोकांनी दुचाकी चालकाला आणि दुचाकीला सुखरूपपणे बाहेर काढले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्यावरून वाहन चालत असताना अनेक नागरिक खाली कोसळत आहेत आणि त्यांच्या अंगाला मोठ्या प्रमाणात जखमा देखील होत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी, असा आवाहन नागरिकांनी केले आहे.

घराची भिंत अंगावर कोसळून इसमाचा मृत्यू

मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात सोमवारी दुपारी घराजवळ काम करीत असताना पावसाने जीर्ण झालेली घराची भिंत अचानक इसमाच्या अंगावर कोसळली. या घराच्या मलब्याखाली दबून इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावात घडली. योगेश देशमुख (३५) असे मृतकाचे नावे आहे.

आणखी वाचा : 

Raigad Rain : किल्ले रायगडावर पावसाचं रौद्ररुप VIDEO, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले

 

 

Share this article