Maharashtra Rain Alert : राज्यात आज अनेक जिल्ह्यांना यलो, तर विदर्भातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Published : Jul 29, 2026, 08:31 AM IST
Maharashtra Rain Alert

सार

आज राज्यातील बहुतांश भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आजही (29 जुलै)  अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात मुंबईसह पाच जिल्ह्यांवर यलो अलर्ट

कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथा परिसरात अधिक पावसाची शक्यता

पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाटमाथा भागात पावसाचा जोर वाढू शकतो.

मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

विदर्भातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम आहे. मात्र गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

नागरिकांनी घ्यावी आवश्यक खबरदारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक