
Maharashtra Monsoon Update : राज्यात हवामानाचा अचानक बदल झाल्यामुळे पावसाचा जोर मागील 12 तासांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मान्सून सक्रिय होत असल्याने आणि तीन चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने आज (19 जून) मुंबई-ठाण्यासाठी पुढील ४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. तर पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूरसारख्या घाटमाथ्याच्या भागांसाठी पुढील १२ तास हायअलर्टवर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, 19 ते 22 जून दरम्यान महाराष्ट्रात विविध भागांत विविध तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येही काही भागांमध्ये जोरदार सरींचा मारा होणार आहे. याच दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
घाटमाथ्यावरील पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांमध्ये या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये वीजांसह 40-50 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये 19 ते 22 जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः लातूरमध्ये २० जून रोजी मेघगर्जनेसह पावसाचा जोर राहील.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर व कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे दि. १९ जून रोजी जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी यांची माहिती.
पावसामुळे वीज पडून मृत्यूच्या घटना
मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसाच्या दिवसात छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी झाली. यावेळी वीज पडल्याने चार जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. याशिवाय एकजण जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या एका 4 जूनच्या घटनेत तुरखेड (नागपूर जिल्हा) येथे 25 वर्षांचा पवन दीपक कोल्हे वीज पडल्याने मृत्युमुखी पडला. त्याच्याबरोबर त्याची आई देखील जखमी म्हणून उपचारासाठी दाखल झाली होती.