
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना हवामान विभागाकडून एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. येत्या १८ जून ते २ जुलै दरम्यान राज्यासह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) व्यक्त करण्यात आली आहे. मात्र प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या तीव्र एल निनोमुळे (El Nino) यंदाच्या पावसाच्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशभरात एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जात असताना हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी आशादायक अंदाज वर्तवला आहे. १८ जून ते २ जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. १४ जूनपर्यंत मान्सूनची उत्तर मर्यादा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, कलिंगपट्टणम, पारादीप आणि इतर भागांपर्यंत पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. हवामानातील बदल आणि वातावरणातील अनुकूल परिस्थितीमुळे पुढील काही दिवसांत मान्सून अधिक वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशांत महासागरात अत्यंत तीव्र एल निनो सक्रिय झाला असून तो गेल्या अनेक दशकांतील सर्वात प्रभावी एल निनो ठरू शकतो, असा अंदाज आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी व्यक्त केला आहे. एल निनोमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते आणि त्याचा थेट परिणाम मान्सूनच्या प्रवाहावर होतो. परिणामी भारतातील पावसाचे प्रमाण कमी होण्यासह काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते.
हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोबरोबरच अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे मान्सूनची वाटचाल काही दिवस मंदावली असून तो सध्या कोकणातील काही भागांमध्ये रेंगाळल्याचे चित्र आहे. मात्र या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एल निनोचा परिणाम केवळ पावसाच्या आगमनावर होऊ शकतो. काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असताना काही ठिकाणी अल्प कालावधीत अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसातील हा असमतोल शेतीसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. यामुळे पुढील काही आठवडे हवामान विभागाच्या अंदाजांकडे शेतकरी आणि प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.