
Maharashtra : मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख रुपये सापडल्याच्या प्रकरणाने जोरदार चर्चेला उधाण आले असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मालवणमध्ये 6-7 घरे अशी आहेत जिथे पैशांच्या बॅग येतात आणि भाजप कार्यकर्ते हे पैसे घेऊन जातात", असा खळबळजनक दावा राणेंनी केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय खडाजंगी अधिक चिघळली आहे. या आरोपांवर आता रवींद्र चव्हाण यांनीही पलटवार करत विरोधकांची पायाखालची वाळू सरकली असल्याचे सांगून प्रतिउत्तर दिले आहे. हे प्रकरण निवडणूक कालावधीत निर्माण झाल्याने दोन्ही पक्षांकडून आरोप–प्रत्यारोपांची लाट उसळली आहे.
निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा मालवणमध्ये येतात, तेव्हा पैशांच्या हालचाली वाढतात. "त्यांच्यावर संशय होता आणि त्यांचं येणं सहज नव्हतं. 6-7 घरांमध्ये रोज पैशांच्या बॅग पोहोचतात", असा त्यांचा आरोप आहे. पैसे वाटून नगरसेवक निवडून आले तर ते लोकसेवा न करता वसुलीचं काम करतील, असा आरोप त्यांनी केला.
राणे यांनी पुढे सांगितले की बाहेरून आलेल्या नेत्यांनी मालवणमध्ये पैशांची संस्कृती आणली आहे. "रवींद्र चव्हाण गडबड करण्यासाठी येतात. विकासाचा अजेंडा कुठे दाखवला?” असा सवालही त्यांनी केला. तसेच "24 तास लक्ष ठेवावे लागणार आहे. पकडलं तर जागच्याजागी बंदोबस्त करू", असेही त्यांनी म्हटले.
जरी त्यांनी चव्हाण यांच्यावर आरोप केले असले तरी संपूर्ण भाजपवर नाही, असे राणेंनी स्पष्ट केले. “भाजप आणि शिवसेना हे एकच कुटुंब आहे. एक माणूस चुकल्याने पूर्ण पक्ष चुकला असे होत नाही”, असे ते म्हणाले. त्यांनी युतीतून बाहेर पडल्यानंतर भाजपने वरिष्ठ नेत्यांकडे मतांसाठी जाण्याबद्दलही टीका केली.
विरोधकांनी दीपक केसरकर आजारी असल्याचे सांगून त्यांचे समर्थन मिळाल्याचा दावा केल्यानंतर राणे संतापले. “एवढ्या वयातही ते प्रचार करत आहेत, त्यांचा मान राखा. घरात बोला, समाजात बोललात तर देव माफ करणार नाही”, अशी कठोर टीका त्यांनी केली. त्यांनी हा सल्ला “लहान भावाला” असल्याचे सांगत अप्रत्यक्ष निशाणा साधला.
विजय किंजवडेकर या भाजप कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाखांची रोकड सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. राणे म्हणाले, “तिथे अजून पैशांच्या बॅगा आहेत. 8-10 घरांत 25 ते 50 लाख रुपये भरून ठेवले आहेत. योग्य ती कारवाई करा.”
राणेंनी दावा केला की भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटत आहेत. त्यांनी काहींची नावे घेत सांगितले की, “हे पैसे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी यंत्रणाही रात्रीसार्चिंग करणार. एकही बॅग सुटणार नाही.”
या सर्व आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. “विरोधकांची पायाखालची वाळू गेल्या 5-6 दिवसांपासूनच सरकली आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील काम योग्य आहे आणि मतदान भरभरून होईल”, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी व्यवसाय करू नये असा नियम नाही, असे चव्हाण म्हणाले. “नेत्यांना अधिकार आहे, मग कार्यकर्त्यांना नाही का?” असा सवाल करत त्यांनी राणेंवर पलटवार केला.