हर्षवर्धन सद्गीरचा ऐतिहासिक पराक्रम! 'बाहुबली'ला आस्मान दाखवत कोरलं 'डबल महाराष्ट्र केसरी' पदावर नाव; बक्षिसांचा वर्षाव

Published : Mar 22, 2026, 09:12 PM IST
harshwardhan sadgir

सार

Maharashtra Kesari 2026: पुण्याच्या वाघोलीत झालेल्या ६८ व्या 'महाराष्ट्र केसरी २०२६' स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सद्गीरने विजेतेपद पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत दुसऱ्यांदा मानाची गदा जिंकली.

पुणे: पुण्याच्या वाघोलीत रंगलेल्या ६८ व्या 'महाराष्ट्र केसरी २०२६' स्पर्धेचा थरार अखेर हर्षवर्धन सद्गीरच्या विजयाने शांत झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सद्गीरने सोलापूरच्या 'बाहुबली' महेंद्र गायकवाडचा पराभव करत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर कुस्ती शौकिनांनी एकच जल्लोष केला.

फायनलचा थरार, अनुभव विरुद्ध ताकद!

अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, हर्षवर्धनने आपल्या दांडग्या अनुभवाचा वापर करत महेंद्र गायकवाडला ४-३ अशा गुणफरकाने नमवले. सोलापूरचा महेंद्र गायकवाड माती विभागातून सिकंदर शेखसारख्या तगड्या मल्लाचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचला होता, तर हर्षवर्धनने गादी विभागातून जय पाटीलला चितपट करत अंतिम फेरीत धडक मारली होती. शेवटी हर्षवर्धनच्या तंत्रापुढे बाहुबलीची ताकद अपुरी पडली.

विजेत्यावर बक्षिसांची मोठी खैरात

'महाराष्ट्र केसरी'ची मानाची चांदीची गदा खांद्यावर घेणाऱ्या हर्षवर्धनवर केवळ कौतुकाचाच नाही, तर बक्षिसांचाही पाऊस पडला आहे.

आलिशान फॉर्च्युनर (Fortuner) गाडी: यंदाच्या विजेत्यासाठी हे सर्वात मोठे आकर्षण होते.

५ लाख रुपये रोख: रोख रकमेचे भव्य पारितोषिक देऊन हर्षवर्धनचा गौरव करण्यात आला.

मानाची चांदीची गदा: कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेल्या गदेने त्याला सन्मानित करण्यात आले.

या बक्षीस वितरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दादा भुसे आणि दत्तात्रय भरणे यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंतिम फेरीपर्यंतचा रंजक प्रवास

सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड: माती विभागाच्या सेमीफायनलमध्ये महेंद्र गायकवाडने 'चपळ चिता' सिकंदर शेखला ३-० ने पराभूत करत कुस्ती रसिकांना थक्क केले होते.

हर्षवर्धन सद्गीरचा दबदबा: गादी विभागात हर्षवर्धनने सोलापूरच्या जय पाटीलला अवघ्या २ मिनिट १२ सेकंदात १०-० अशा 'टेक्निकल सुपरिअरिटी'ने हरवून फायनलमध्ये जागा मिळवली होती.

नाशिकच्या हर्षवर्धनने आता दुसऱ्यांदा मानाची गदा पटकावून कुस्तीच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Pune Water Cut Update: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन
Women Safety: महिलांनो, आता घाबरू नका! एका क्लिकवर मिळणार न्याय; राज्य सरकारचे 'महिला सन्मान पोर्टल' सुरू, घरी बसून नोंदवा तक्रार