Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुणे-सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टी, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Published : Jul 25, 2026, 08:34 AM IST
Rains

सार

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा जारी केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले  आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याशिवाय गुना, सिधी आणि ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत वातावरणात बदल झाल्याने महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार आहे. विशेषतः पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबईत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

23 राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसह एकूण 23 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम

यंदा जून महिन्यात राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नव्हता. मात्र जूनअखेर पावसाने हजेरी लावल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा राज्यभर पावसाचा वेग वाढला आहे. यामुळे पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक