Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; ‘गॉडझिला एल निनो’चा इशारा, 18-19 एप्रिलला पावसाची शक्यता

Published : Apr 17, 2026, 10:30 AM IST
heatwave

सार

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत असून काही भागात 40 ते 45 अंशांपर्यंत तापमान नोंदवले जात आहे. याचदरम्यान ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 18-19 एप्रिल रोजी काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र सध्या प्रचंड उष्णतेच्या विळख्यात सापडला असून नागरिकांना उकाड्याने अक्षरशः हैराण केले आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहणार असतानाच, ‘एल निनो’चा वाढता प्रभाव आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

'गॉडझिला एल निनो’चा धोका; मान्सूनवर परिणाम

हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील तापमानवाढीमुळे ‘एल निनो’ परिस्थिती निर्माण होते. यंदा हा प्रभाव अधिक तीव्र असण्याची शक्यता असून त्याला ‘गॉडझिला एल निनो’ असे संबोधले जात आहे. जूनमध्ये पावसाची सुरुवात समाधानकारक होण्याची शक्यता असली तरी जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोणत्या भागांना बसणार फटका?

या हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांवर होण्याची शक्यता आहे. या भागातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने पीक नियोजनावर मोठा परिणाम होऊ शकतो. पावसाची कमतरता भासल्यास पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

18-19 एप्रिलला पावसाची शक्यता

उष्णतेच्या तडाख्यात असतानाच, येत्या 48 तासांत हवामानात बदल होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे 18 आणि 19 एप्रिल रोजी राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहू शकते.

तापमान 40-45 अंशांच्या पार; उष्णतेचा इशारा

राज्यातील बहुतांश शहरांमध्ये तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान पोहोचले असून काही ठिकाणी ते 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे धोकादायक ठरत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नागरिक आणि प्राण्यांवरही परिणाम

उष्णतेच्या लाटेमुळे केवळ नागरिकच नव्हे, तर प्राणीही त्रस्त झाले आहेत. नागपूरमधील प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी कुलर, पाण्याची व्यवस्था आणि आहारात बदल करण्यात आले आहेत. शहरांमध्ये शीतपेयांची दुकाने वाढली असून वीजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

प्रशासनाचा इशारा; ‘येलो अलर्ट’ जारी

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांसाठी हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. उष्माघात टाळण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'