Maharashtra Govt Scheme : दिवाळीआधी सर्वसामान्यांसाठी निराशाजनक बातमी, शासनाची ही योजनाही बंद होणार?

Published : Oct 06, 2025, 08:25 AM IST
Maharashtra Govt Scheme

सार

Maharashtra Govt Scheme : राज्य सरकारची ‘आनंदाचा शिधा’ योजना आर्थिक तंगीमुळे थांबण्याच्या मार्गावर आहे. 2023-24 मध्ये लोकप्रिय ठरलेली ही योजना यंदाच्या दिवाळीसाठी राबवण्यात आलेली नाही. यामुळे ही योजना बंद होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Maharashtra Govt Scheme :  राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांपैकी एक ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha Yojana) आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. यापूर्वी ‘शिवभोजन थाळी’ योजना जवळपास ठप्प पडल्याचं दिसलं होतं. त्याच धर्तीवर आता ही योजना देखील थांबवली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गरीबांसाठी सणासुदीत गोडधोडचा प्रयत्न

गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावं, यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. रेशनच्या दुकानांवरून फक्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा किट’ दिलं जात होतं. यात एक किलो चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता.वर्ष 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी तसेच 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ही किट वितरित करण्यात आली होती. मात्र, यंदा ना गणेशोत्सवात, ना दिवाळीत ही योजना राबवली गेली.

अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिक निराश

मराठवाडा आणि सोलापूर विभागात यंदा अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. शेती आणि घरादाराचं मोठं नुकसान झाल्याने जनता हवालदिल झाली आहे. अशा परिस्थितीत किमान या भागात तरी सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ मिळेल अशी अपेक्षा होती. पण दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर असतानाही कोणतीही हालचाल न झाल्याने, या भागातही किट न मिळण्याची शक्यता पक्की झाली आहे.

लोकप्रिय योजना पण निधीअभावी अडचणीत

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लोकप्रिय योजनांचा डोंगर उभा केला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर आर्थिक तंगीचं कारण देत निधीपुरवठा थांबवला गेला आहे. ‘आनंदाचा शिधा’, ‘शिवभोजन थाळी’, ‘तीर्थाटन योजना’, ‘लाडकी बहीण योजना’ यांसारख्या योजनांना आता निधी न मिळाल्याने त्या बंद होण्याच्या स्थितीत आहेत.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मात्र “कोणतीही योजना बंद झालेली नाही” असं स्पष्ट केलं आहे.

आनंदाचा शिधा योजना म्हणजे काय?

दसरा-दिवाळी सारख्या सणांच्या काळात रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरात खाद्यपदार्थाचं किट मिळायचं. पांढऱ्या रेशन कार्डधारकांशिवाय सर्व पात्र नागरिकांना एक किलो पामतेल, रवा, चणाडाळ आणि साखर फक्त 100 रुपयांमध्ये मिळायचं.या योजनेचा 1 कोटी 72 लाख नागरिकांनी लाभ घेतला होता. मात्र, आता निधीअभावी ही योजना थांबण्याच्या मार्गावर आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

MHADA Lottery 2026 : म्हाडाची नवीन वर्षाची भेट! हजारो घरांची बंपर लॉटरी जाहीर; स्वस्तात घर मिळवण्यासाठी 'या' तारखेपूर्वी करा अर्ज!
Pune News : सावधान! पुण्यात २ दिवस पीएमपीची चाके थांबणार; घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचाच!