मुंबई : संजय राऊत यांनी बोलल्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोलेसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मान्य आहे का? हे त्यांनी येत्या 24 तासाच्या आत जाहीर करावे. राज्यात जर उद्या मतदान घेतले तर राज्याची 14 कोटी लोकसंख्या हे ठरवेल की, महाराष्ट्राचे राजकारण आणि एकंदरीत परिस्थिती कोणामुळे खराब झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात असे दिवस का आले? याचे उत्तर तपासल्यावर त्यात पहिले नाव येईल ते उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि त्यानंतर नाव येईल ते त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. ते मुंबई येथे बोलत होते.
उद्धव ठाकरे लबाड काँग्रेस पार्टी सोबत, म्हणून तुम्हाला लबाडीच दिसते
उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य करताना अतिशय गलिच्छ शब्दाचा वापर केला आहे. निव्वळ राजकीय हेतूने त्यांनी या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटक हिमाचल सारख्या राज्यांमध्ये जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे यांनी खोटारडेपणाच केला आहे. गृहमंत्र्यासारख्या योजना जाहीर करून निवडणूक झाल्यानंतर या योजना तेव्हाच बंद केल्या. देशभरात जिथे जिथे महायुती भाजपचे सरकार आहे तिथे या योजना निरंतरपणे सुरू आहे. एकट्या मध्य प्रदेश मध्ये गेल्या दहा वर्षापासून ही योजना सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना माझे एवढेच सांगणे आहे की, लबाड काँग्रेस पार्टी सोबत सध्या तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला लबाडीच दिसत आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.
श्रीमंतांच्या घरात जन्माला आलेल्यांना काय कळणार?
राज्यातील लाखो लाभार्थी महिला आणि भगिनींसाठी महत्त्वकांक्षी ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसचे लोक हायकोर्टापर्यंत गेलेत. एकीकडे योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे याच योजनेवरून गालबोट लावण्याचे प्रयत्न करायचे. उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना माझे एवढेच सांगणे आहे की, पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे वर्षाला 18 हजार रुपये होतात. आमच्या लाडक्या बहिणीने यातील निव्वळ तीन हजार रुपये कुठल्याही इन्शुरन्स अथवा विमा काढला तर संपूर्ण कुटुंबाची आरोग्य, शैक्षणिक आणि कुटुंबातील जीवांचे रक्षण त्यातून होऊ शकतं. श्रीमंतांच्या घरात ज्यांनी जन्म घेतला त्यांना या योजनेचा महत्त्व कधी कळणार नाही.
निव्वळ राजकीय भीतीपोटी आरोप
मात्र ज्या गरजू आणि पीडित कुटुंबाला ही मदत मिळेल त्यांची आर्थिक बाजूला कुठेतरी ही योजना हातभार लावेल. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांना निव्वळ राजकीय भीतीपोटी ते असे आरोप करत आहेत. मात्र राज्यात जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना अविरतपणे अशी सुरू राहील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.
आणखी वाचा :
राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...