पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा देखील गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंनी दोन-तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला माहीत नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही, तसा माझा इतिहास नाही. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला कळलेले नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही. मला माझा महाराष्ट्र थोडासा ओळखतो. माझी अशी पार्श्वभूमी नाही, मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही. त्यांनी कारण नसताना माझे नाव घेतले आहे. मी पण आज महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या पण गाड्या अडवल्या आहेत. आता हे पण पवारांनी सांगितलय का मला अडवा...
शरद पवारांचा राज ठाकरेंना प्रतिसवाल
महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र शरद पवार यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रतिसवाल केला आहे. मणीपूरचा प्रश्न वेगळा आहे. हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? असा प्रतिसवाल पवारांनी केला आहे.
परमबीर सिंह यांनी पुरावे द्यावे : शरद पवार
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर शरद पवार म्हणाले, अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. तीन वर्षांनंतर त्यांना का जाग आली? त्यांनी पुरावे द्यावेत. त्यांनी ते दिले तर त्यातून बरेच काही बाहेर येईल, असे शरद पवार म्हणाले.
मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी का?, शरद पवार म्हणतात
जरांगे पाटील आगामी विधासभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. याविषयी शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, लोकशाही प्रत्येकाचा आधिकार आहे. मतं मागण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा.
आणखी वाचा :
भुजबळांचे आव्हान जरांगे स्वीकारणार का?, 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार