Maharashtra : भाजप सत्तेवर अजित पवारांचा हल्लाबोल; पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप

Published : Jan 03, 2026, 08:56 AM IST
Maharashtra

सार

Maharashtra : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अजित पवार यांनी जोरदार टीका करत महापालिका भ्रष्टाचारामुळे कर्जबाजारी झाल्याचा आरोप केला. 

Maharashtra : आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्याची अवस्था सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे दयनीय झाली असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत सत्तेचा माज आल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळे महापालिका कर्जबाजारी झाल्याचं त्यांनी म्हटलं.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीकास्त्र

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. या वेळी आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

‘श्रीमंत महापालिकेच्या ठेवी मोडल्या’

अजित पवार म्हणाले, “आमच्या काळात शहराचा नियोजनबद्ध विकास झाला. मात्र २०१७ नंतर सत्तेत आलेल्या लोकांनी महापालिकेच्या ठेवी मोडून काढल्या, कर्ज काढलं आणि संस्थेला आर्थिक संकटात ढकललं.” त्यांनी भाजपचं नाव थेट न घेता सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचा आरोप

अजित पवारांच्या मते, रस्ते खोदकाम, कचरा व्यवस्थापन, रस्ते व पदपथ बांधणी, कुत्र्यांची नसबंदी अशा जवळपास प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाला आहे. “शहराचे रस्त्याच्या अलीकडे-पलीकडे असे वाटप करण्यात आले असून प्रत्येक टेंडरमध्ये ‘रिंग’ केली जाते,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत अडकल्याचा उल्लेख

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरी करताना पकडले गेल्याची घटना घडल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. सत्तेचा माज वाढल्याने दादागिरी, हप्तेवसुली आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.

स्मार्ट सिटी प्रकल्पावरही घणाघाती टीका

स्मार्ट सिटी प्रकल्प अपयशी ठरण्यामागेही भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचं अजित पवार म्हणाले. “खासगी बांधकाम व्यावसायिक 3500 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने बांधकाम करतो, तर महापालिकेचा खर्च 4500 रुपये प्रति स्क्वेअर फूट जातो. हा सरळसरळ भ्रष्टाचार आहे,” असं ते म्हणाले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

MHADA Pune Lottery : म्हाडाच्या घरांचे स्वप्न लांबणीवर! २ लाख अर्जदारांची धाकधूक वाढली; आता 'या' तारखेला निघणार सोडत
रेशन कार्डवर 'हा' १२ अंकी नंबर आहे का? त्वरित तपासा, मिळणार ₹५ लाखांचा मोफत उपचार!