शेतकऱ्यांनो पेरणीसाठी तयार रहा, 'या' तारखेला राज्यात मान्सूनचं होणार आगमन

आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनने आपल्या प्रवासाचा वेग वाढवला आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 28, 2024 9:22 AM IST

मुंबई: राज्यातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सूनबद्दल दिलासा देणारी बातमी दिली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सूनच्या प्रवासाने वेग घेतला आहे. ज्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

मान्सूनचे पुढच्या ५ दिवसांत आगमन होणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनने आपल्या प्रवासाचा वेग वाढवला आहे. याआधीच १९ मेला मान्सून अंदमान-निकोबार बेटांसह भारताच्या वेशीवर आला असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. हवामान विभागाने मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आता पुढील पाच दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. यावर्षी मान्सूनच्या वेगाने प्रवासासाठी काहीशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेआधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर १० ते ११ जूनपर्यंत मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

 

Share this article