Amol Mitkari vs Medha Kulkarni : बारामती सभेचा किस्सा सांगितल्यानंतर अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार

Published : Jun 01, 2024, 05:39 PM IST
Amol Mitkari Medha  Kulkarni

सार

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बारामती मधल्या सभेचा किस्सा सांगितल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

बारामतीमध्ये अमोल मिटकरांसोबत स्टेजवर बसण्यास नकार दिल्याचा किस्सा सांगत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी टीका केली होती. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या विधानाबाबत आता आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही, असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना आता मिटकरी यांनी मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

पुरोहितांची, मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसह मी स्टेजवर बसणार नाही अशी भूमिका मी घेतली होती असं सांगत मेधा कुलकर्णींनी अमोल मिटकरींवर टीका केली होती. सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सत्कार मेधा कुलकर्णींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींबाबत एक किस्सा सांगितला. यावरुन आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

"अमोल मिटकरी हे बारामतीतल्या एका कार्यक्रमात स्टेजवर येणार होते. मी त्या स्टेजवर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर अमोल मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची म्हणा, पण उगाच काही ऐकून घेणार नाही. ब्राह्मण समाज अतिशय साधा आहे. मात्र विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ट करणारे अमोल मिटकरी व्यासपीठावर येणार आहेत हे समजल्यावर मी ठाम भूमिका घेतली," असा किस्सा मेधा कुलकर्णी यांनी सांगलीतल्या कार्यक्रमात बोलताना सांगितला.

मेधा कुलकर्णींच्या या विधानानंतर अमोल मिटकरी यांनी टीव्ही९ सोबत बोलताना अशा वक्तव्याने राज्यघटनेवरील शंकेला दुजोरा मिळेल असं प्रत्युत्तर दिलं आहे. "लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा कुणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळी त्याला जी शपथ दिलेली असते ती महत्त्वाची असते. खासदारकीची शपथ दिल्यानंतर तो सदस्य कुठल्याही एका समाजाचा राहात नाही तर तो देशाचा होतो. जर शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजापुरते आहोत असं कुणी वागत असेल तर भारतीय संविधानाच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे. असाच प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला," असं अमोल मिटकरी म्हणाले.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर