
मुंबई : महाराष्ट्रात सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अनेक योजनांवर परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी वर्षाला तब्बल 45,000 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च येत असल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. याच आर्थिक भारामुळे यंदा दिवाळीमध्ये गरिबांना मिळणारा आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) बंद करण्यात आल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळ यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या निधीमुळे इतर महत्त्वाच्या योजनांना फटका बसत आहे. सध्या सरकारने निधीची काटकसर करण्यावर भर दिला आहे. म्हणूनच, वर्षाला सुमारे 350 कोटी रुपये खर्च येणारी आनंदाचा शिधा ही योजना यंदा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असून, सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधीही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर तीव्र टीका केली असून, एका लोकप्रिय योजनेमुळे सामान्य जनतेवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
भुजबळ यांनी पुढे सांगितले की, भविष्यात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास आनंदाचा शिधा योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल. पण सद्यस्थितीत, लाडकी बहीण योजनेचा मोठा खर्च पाहता, अनेक योजनांना ब्रेक लावण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्यामुळे, यंदा दिवाळीत गरजू कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
ही योजना तात्पुरती बंद झाली आहे की कायमस्वरूपी, हे राज्याच्या पुढील आर्थिक स्थितीवर अवलंबून असेल. यामुळे, आनंदाच्या शिधाची वाट पाहणाऱ्या लाखो गरिबांच्या पदरी यंदा निराशा पडणार आहे.