
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. गेल्या वर्षभरात या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची संख्या तब्बल अडीच कोटींपेक्षा जास्त आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने ही योजना महत्वाची ठरली असली तरी तिचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आता उघड होत आहे.
नुकत्याच झालेल्या पडताळणीत समोर आलं की, लाखो अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. यात सरकारी महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेतून बेकायदेशीर लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
वित्त विभागाने यासंदर्भात आदेश काढले असून, या ८ हजार महिला कर्मचाऱ्यांकडून सुमारे १५ कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. एवढंच नव्हे तर, संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारीही प्रशासनाकडून सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे.
या प्रकरणात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. गेल्या एका वर्षापासून या सेविकांनी दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ घेतला असून, आता सरकार त्या सर्व रकमेची वसुली करणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्यरीत्या घेतलेला लाभ योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
सरकारने स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच दिला जाईल. अपात्र अर्जदारांविरोधात कडक कारवाई होईल. या पडताळणीत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, ज्यामुळे पुढील काळात योजना अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होण्याची शक्यता आहे.