
खारघर: शनिवारी सायंकाळच्या वेळी नवी मुंबईतल्या खारघर परिसरात एका १९ वर्षीय ‘पापा की परी’ने आपल्या आलिशान मर्सिडीजमधून भरधाव वेगात येत, स्कुटीवरून जात असलेल्या दाम्पत्याला जबर धडक दिली. या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना खारघरमधील हिरानंदानी पुलावर घडली. गोपाळ यादव आणि त्यांची पत्नी स्कुटीवरून नेहमीप्रमाणे जात होते. त्याच वेळी १९ वर्षांची तिथी सिंग ही तरुणी तिच्या मर्सिडीज कारने भरधाव वेगाने मागून आली आणि स्कुटीला जोरदार धडक दिली. धक्क्याचा जोर इतका होता की दोघंही रस्त्यावर दूर फेकले गेले.
या भीषण धडकेत गोपाळ यादव यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर यादव यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका क्षणात कुटुंबाचं आयुष्य उध्वस्त झालं.
या अपघातानंतर खारघर पोलीस ठाण्यात तिथी सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कार जप्त केली आहे. वाहनचालक तरुणीने वेगावर नियंत्रण गमावल्याने अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
या अपघातामुळे पुन्हा एकदा ‘हाय प्रोफाईल’ अपघातांवर आणि श्रीमंत घरातल्या बेफिकीर मुलांवर प्रश्न उपस्थित होतो आहे. सोशल मीडियावर या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “गाडी आली मर्सिडीज, पण पायघड्या होत्या बेजबाबदारपणाच्या!” अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
फारच कमी वयात आलिशान गाड्यांची चावी हाती दिल्यावर, नियमांचा विसर आणि इतरांच्या आयुष्याशी खेळ सुरू होतो. प्रश्न असा आहे की, अशा घटनांची जबाबदारी कुणी घ्यायची?