
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. केतनचं सिया गोयल या २० वर्षीय तरुणीशी लग्न जमलं होतं. पण सियाला केतनशी लग्न करायचं नसल्याने तिने पूर्णपणे योजना आखून केतनची हत्या केली. केतनला लोहगडावरुन ढकलून त्याला संपवलं. सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने, दोघांनी प्लॅन करुन केतनच्या आयुष्याची अखेर केली. सध्या या दोघांना पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलिसांकडून अनेक गोष्टींचा कसून तपास सुरू आहे. याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिया आणि चेतन दोघंही लग्न करुन राजस्थानला कायमचे राहणार असल्याचा त्यांचा प्लॅन होता अशी माहिती आरोपी चेतनच्या काही मित्रांकडून मिळाली आहे.
आरोपी चेतन चौधरीच्या मित्रांनी काय सांगितलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन चौधरी मूळचा राजस्थानातील जोधपूरमधील पलासनी येथील आहे. पण तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. पुण्यातच त्याची आणि सियाची पहिली भेट झाली होती. सिया गोयल हिच्या भावामुळे म्हणजेच साहिल गोयलमुळे चेतन आणि सिया यांची मैत्री झाली होती. आरोपी चेतन क्रिकेट खेळायचा, त्याची यादरम्यान साहिल गोयलशी ओळख झाली. पुढे सियाशीही त्याची ओळख झाली, मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
काही महिन्यांपूर्वी सिया आणि चेतन हे दोघं एकत्र उदयपूर आणि जोधपूरला फिरायला गेले होते. तिथे गेल्यानंतर मूळचा जोधपूरचा असलेल्या चेतनच्या मित्रांनी त्याला सियासोबत पाहिलं होतं. त्यावेळी चेतनने त्याच्या जोधपूरच्या मित्रांना आम्ही दोघं एकत्र आहोत, आम्ही रिलेशनशिपमध्ये असून लग्नही करणार आहोत, असं सांगितलं होतं. तसंच लग्नानंतर दोघं जोधपूरमध्ये कायमचे राहायला येणार असल्याचाही सिया आणि चेतनचा प्लॅन होता. लग्न झाल्यानंतर जोधपूरमध्ये येण्यासाठी सिया तिच्या कुटुंबातून पैशांची सोय करणार असल्याचं चेतनने त्याच्या मित्रांना सांगितलं होतं, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.