
संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कन्येचा साखरपुडा सोहळा पार पडला असून, या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा ४ नोव्हेंबर रोजी संगमनेर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
महाराष्ट्रभरातील लाखो भक्तांच्या उपस्थितीत, कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
इंदोरीकर महाराजांच्या जावयाचे नाव साहिल चिलप असे असून ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे रहिवासी आहेत. सध्या ते नवी मुंबईत व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. साहिल चिलप यांच्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे शेकडो ट्रक आणि व्यावसायिक वाहने असल्याची माहिती समोर आली आहे.
इंदोरीकर महाराजांचे मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे रहिवासी असल्याने त्यांना ‘इंदोरीकर महाराज’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी बी.एस्सी. बीएड. पर्यंत शिक्षण घेतले असून नंतर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आणि आज ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय कीर्तनकारांपैकी एक आहेत.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश होता. कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांचे हजारो चाहते आणि भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
इंदोरीकर महाराज त्यांच्या विनोदी आणि प्रबोधनात्मक कीर्तनशैलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. त्यामुळे त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्यावेळीही अनेक भक्तांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.
या सोहळ्याचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ सध्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि X (ट्विटर) वर प्रचंड व्हायरल होत असून, लोक इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.