Traffic Rules Maharashtra : HSRP नसलेल्या वाहनांवर १५ फेब्रुवारीपासून दंडात्मक कारवाई; परिवहन विभागाची कडक भूमिका

Published : Feb 12, 2026, 11:15 AM IST
Traffic Rules Maharashtra

सार

Traffic Rules Maharashtra : २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक असताना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन विभागाने १५ फेब्रुवारीपासून थेट दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. 

Traffic Rules Maharashtra : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याबाबत वारंवार मुदतवाढ देऊनही वाहनधारकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारीपासून HSRP नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसविणे अनिवार्य आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पासून प्रत्यक्ष नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे २५ लाख वाहनांना HSRP आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १० लाख ७० हजार वाहनधारकांनी नोंदणी केली असून त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनांवर प्रत्यक्ष HSRP बसविण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे १५ लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप नियमांचे पालन केलेले नाही.

पाच वेळा मुदतवाढ, तरीही प्रतिसाद कमी

परिवहन विभागाने वाहनधारकांना दिलासा देत ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर २०२५ अशा टप्प्याटप्प्याने पाच वेळा मुदतवाढ दिली होती. ३१ डिसेंबरनंतरही कारवाई न करता अतिरिक्त वेळ देण्यात आला. तथापि, जनजागृती मोहिमा आणि सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दंडासोबत कागदपत्रांचीही तपासणी

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, मुदतीपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना मर्यादित सवलत देण्यात येईल. मात्र १५ फेब्रुवारीनंतर नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.

तपासणीदरम्यान वाहनांची HSRP, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि वाहनचालक परवाना यांचीही पडताळणी केली जाणार आहे. काही फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट असूनही वाहनधारक वेळेवर न पोहोचल्याने प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

HSRP आकडेवारी (पुणे शहर व जिल्हा)

  • HSRP साठी नोंदणी केलेली वाहने: १०,७०,०००
  • प्रत्यक्ष HSRP बसवलेली वाहने: ८,६२,०००
  • नोंदणी न केलेली वाहने: १५,३०,०००

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक