Hingoli News : NEET पुनर्परीक्षा | तरुणाने आयुष्य संपवलं, आईसाठी ३३ सेकंदाचा व्हीडिओ मेसेज

Published : Jun 25, 2026, 06:48 PM IST
Hingoli Crime

सार

हिंगोलीतील एका १८ वर्षीय तरुणाने नीट पुनर्परीक्षा दिल्यानंतर टोकाचं पाऊल उचललं. त्याने मृत्यूआधी आपल्या आईसाठी एक व्हिडिओ तयार केला. व्हिडिओमध्ये त्याने आईसाठी संदेश देत आयुष्याची अखेर केली.

हिंगोली : नीट परीक्षेनंतर तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंगोली येथील एका १८ वर्षीय मुलाने आपलं आयुष्य संपवलं. त्याच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत आहे. सुशील धागे असं तरुणाचं नाव असून तो हिंगोलीतील अष्टविनायक नगरचा राहणारा आहे. सुशीलने बुधवारी सकाळी जवळपास १० वाजण्याच्या सुमारास विहीरीत उडी मारुन जीवन संपवलं.

सुशील धागे या १८ वर्षीय तरुणाने टोकाच्या निर्णयाआधी आपल्या आईसाठी मोबाईलमध्ये खास व्हिडिओ तयार केला होता. त्याने ३३ सेकंदाचा व्हिडिओ तयार करत त्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्य संपवत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तरुणाने व्हिडिओत नेमकं काय म्हटलं होतं, याची माहिती देत एका अधिकाऱ्याने सांगितलं, की 'मी आयुष्य संपवत आहे. पण आई तू काळजी करू नको. पुढच्या जन्मी मला पुन्हा तुमच्या पोटी, तुझं मूल व्हायचं आहे. तु सुमेधसोबत राहा, मला माफ कर', असा व्हिडिओ त्याने तयार करत आईला खास संदेश दिला आहे.

सुशीलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET-UG ची फेरपरीक्षा दिल्यापासून सुशील फार अस्वस्थ होता. त्याला ही नीट यूजी पुनर्परीक्षा कठीण गेली होती. कुटुंबियांच्या या माहितीनंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA द्वारे या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परीक्षेचा आणि सुशीलच्या मृत्यूचा काही थेट संबंध आहे का की नाही याचा तपास संबंधित तपास पथकाकडून केला जात आहे.

हिंगोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुशीलच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच कुटुंबाने केलेल्या तक्रारीत नीट फेरपरीक्षेचा उल्लेखही करण्यात आला आहे. अशात आता पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी पडताळणी केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pune Ketan Lohagad Case : केतन जिवंत आहे, ती घाबरेल म्हणून खोटं सांगितलं; पण यानंतर सिया...
Tukaram Munde | तुकाराम मुंढेंची बदली करू नये यासाठी समर्थकांकडून दुग्धाभिषेक