
मुंबई: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या सरकारच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. या निर्णयाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला असला तरी, ५ जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गट यांच्या संयुक्त विद्यमाने निघणाऱ्या मोर्चापासून काँग्रेस दूर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
एकिकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी, विशेषतः ठाकरे गटाने, हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस या मोर्चापासून दूर राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
याबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध आहे. पण ५ जुलै रोजी होणारा मोर्चा म्हणजे सर्व काही आहे असे नाही. मोर्चाला आमच्या शुभेच्छा आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात असे अनेक आंदोलनं होत आहेत, त्यामुळे याही मोर्चाला आमच्या शुभेच्छा."
महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून काँग्रेसने हा निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. सपकाळ यांनी भाजपवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत म्हटले, "८ व्या सूचीतील सर्व भाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ आणि भाजपचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू आणि मराठीचा गळा घोटू देणार नाही."
शनिवारी (२८ जून) मुंबईत पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी आपला मुद्दा अधिक स्पष्ट केला. ते म्हणाले, "हिंदी भाषेचा सन्मानच आहे, पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व संस्था आपापल्या पद्धतीने या निर्णयाचा विरोध करत आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाच्यावतीने मी साहित्यिकांना पत्र लिहून आवाहनही केले आहे. तर काही जण मोर्चा काढत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा हीच सर्वांची दिशा आहे. हा संस्कृतीचा लढा आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन लढले पाहिजे. कोणाचा फोन वा निमंत्रण आले का, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आम्ही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात लढत आहोत."
एका प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ यांनी भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी? गुजरातमध्ये एक नीती आणि महाराष्ट्रात दुसरी नीती कशी? हे फडणवीस आणि बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे." तसेच, गोलवलकर यांच्या 'बंच ऑफ थॉट'बद्दलही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान सपकाळ यांनी दिले.