
नवी दिल्ली: मुंबईतील अनेक बॉम्बस्फोटांचा दोषी आणि इस्लामिक स्टेट (ISIS) या कुख्यात दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा सदस्य साकिब नाचन याचा तिहार तुरुंगात ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने दहशतवादविरोधी यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण तो महाराष्ट्रातील ISIS मॉड्यूलचा प्रमुख मानला जात होता आणि 'पडघा' गावाला इस्लामिक सिरिया म्हणजेच 'अल-शाम' बनवण्याचं त्याचं भयावह स्वप्न होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात दहशतवादी साकिब नाचन तिहार तुरुंगातील क्रमांक १ मध्ये अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ब्रेन हॅमरेजवर त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाचन हा ISIS मॉड्यूलमधील एक महत्त्वाचा आरोपी होता आणि त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.
साकिब नाचनला २००२ आणि २००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आले होते. दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POTA) शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवून १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर २०१७ मध्ये त्याची सुटका झाली. याच वर्षी तो ISIS मध्ये सामील झाला आणि महाराष्ट्रातील त्यांच्या मॉड्यूलचा प्रमुख बनला.
पोलिसांच्या माहितीनुसार, साकिब नाचन हा महाराष्ट्र ISIS मॉड्यूलचा प्रमुख होता. त्याने भिवंडीजवळील 'पडघा' या गावाला एक स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा संशय पोलिसांना आहे. पडघ्याला 'अल-शाम' (एक प्रकारचा इस्लामिक सिरिया) बनवण्याची त्याची योजना होती. त्याने पडघा गावाला 'अल-शाम' असे नावही दिले होते. हा त्याचा कट उघडकीस आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या होत्या.
डिसेंबर २०२३ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) साकिब नाचन आणि त्याचा मुलगा शामिल यांच्यासह एकूण १४ जणांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान NIA ने साकिबसह इतर आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि रोख रक्कम जप्त केली होती. नाचनच्या मृत्यूने एका मोठ्या दहशतवादी कटाचा एक महत्त्वाचा दुवा संपुष्टात आला आहे.