
कोकणात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जोराचा पाऊस पडत असल्यामुळे मंगळवारी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रायगडमधील सावित्री, आंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून संपूर्ण जिल्ह्याला ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे. तर जगबुडी, कोदवली, शास्त्री या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने रत्नागिरीतील अनेक भाग जलमय झाले आहेत.
सिंधुदुर्ग परिसरात पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड शहराला पाण्याने वेढलं आहे. रावढळ पुलावरून पाणी जात असून, महाड शहरातून रायगडकडे जाणारा दस्तुरी मार्ग बंद करण्यात आला. आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागठाणे येथील बस स्थानकात पाणी शिरल्यामुळे येथील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
रोहे शहर, आंबेवाडी नाका आणि कोलाड नाक्यावर पाणी शिरल्यामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांच्या घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून म्हसळा येथे १३० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस पडला आहे. संगमेश्वर, देवरुख, साखरपा, लांजा, राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. संगमेश्वर येथे डोंगराचा भाग वारंवार येत असल्यामुळे अडथळा पार करून सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाने सर्वांना आवाहन केले आहे की, पूरप्रवण भागात न जाता सावध रहा, बचाव यंत्रणांकडून मदतकार्य चालू असून तुम्ही त्यांच्याकडून अपडेट मिळवत रहा. नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना अंमलात आणा.