
Maharashtra: राज्यातील काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आज मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि आसपासच्या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील २४ तास सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून, आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईत आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हवामानामुळे सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळणावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाणं टाळावं आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पालघर जिल्ह्यात आज काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता असून, संभाव्य धोका लक्षात घेता हवामान विभागाने पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मासेमार, शेतकरी आणि खेड्यातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असल्याने स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी गरजेचे सामान जवळ ठेवून आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.