
मुंबई: मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. या पडणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल झाले आहेत. अनेक भागामध्ये तर सूर्यकिरणाने दर्शन दिलेलं नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरासह विदर्भातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्याच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, पुढील 48 तासांमध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र, कोकण घाटमाथा या भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसह काही भागांमध्ये हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.
पुढील दोन दिवस पावसाचे हेच चित्र राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघरला पाऊस झोडपणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्याच्या समुद्रकिनारी भागांमध्ये चांगला पाऊस पडणार असून समुद्र खवळला असल्यामुळे मच्छिमारांनी मासे पकडायला गेल्यानंतर काळजी घेण्याचे अवाहन केलं आहे.
राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यामुळं पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागांत अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि प्रामुख्याने घाटमाथ्यावर मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात 18, 19 ऑगस्टदगरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.