
प्रियकर आणि प्रियसी या दोघांमधील नात खूप जिव्हाळ्याचं असतं. त्यामुळं या दोघांमधील नातं थोडं जरी बिघडलं तरी एकमेकांना जमत नाही. लातूर शहरातील म्हाडा कॉलनीत एका मुलीनं आत्महत्या केली आहे. १९ वर्षीय तरुणीनं बॉयफ्रेंडने कॉल उचलला नाही म्हणून आत्महत्या केली. हे समजल्यावर मुलानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
प्रेमप्रकरणातून घटना घडल्याची माहिती पीएसआय मनीष आंधळे यांनी दिली आहे. वैष्णवी विनोद लादे (१९) असं मृत तरुणीचं नाव आहे. तरुणाचे नाव नरेंद्र रामराव राठोड असे आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी निवृत्त शिक्षक रामराव राठोड यांचे म्हाडा कॉलनीत घर आहे. त्या घरात त्यांचा मुलगा नरेंद्र (२५) शिक्षणासाठी एकटाच राहतो. या घरापासून काही अंतरावर बारावीचे शिक्षण झालेली वैष्णवी लादे राहत होती.
मृत वैष्णवी ही एका मॉलमध्ये कामाला होती. मागील काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. नरेंद्र हा पुण्यात नोकरीला गेला होता पण तो आल्यावर वैष्णवीला भेटायला गेला. पण तो तिथं गेल्यानंतर त्याला तेथे काम करणाऱ्या मुलांनी त्यांना मारहाण केली होती. नरेंद्रने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला पण आता त्याची तब्येत व्यवस्थित आहे.
रात्री ११ वाजता जेवण झाले का? असा वैष्णवीचा मेसेज आला. त्यानंतर मी झोपी गेलो. मध्यरात्री २ वाजता तिचे दोन कॉल येऊन गेले. परंतु फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे मला समजले नाही. ते कॉल मी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पाहिले. नेहमी सकाळी १०.३० नंतर तिचा कॉल यायचा, परंतु मी कॉल केल्यावर माझा नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेला आढळला. त्यानंतर सकाळी ११ वाजता तिने आत्महत्या केल्याचे माझ्या मित्राकडून समजले. मी औसा रोडवरून विषाची बाटली खरेदी करून विष घेतले. रात्रीच तिचे कॉल मी उचलले असते तर कदाचित ती वाचली असती, असं नरेंद्रने सांगितलं आहे.