
पुणे शहरातील फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना एका परदेशी नागरिकाने थांबवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा प्रकार पुण्यातील पिंपळे निलख परिसरात घडल्याचे सांगितलं जातंय. फुटपाथ हा पायी चालणाऱ्यांसाठी असून वाहनांसाठी नाही, हे समजावून सांगताना परदेशी नागरिक दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओत दोन परदेशी नागरिक फुटपाथवर उभे राहून दुचाकीस्वारांना थांबवत आहेत. काही वाहनचालक ट्रॅफिक टाळण्यासाठी थेट फुटपाथवरून गाडी चालवत होते. यावेळी परदेशी नागरिकांनी शांतपणे त्यांना मुख्य रस्त्यावरून जाण्याचा सल्ला दिला आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. पुणे शहरात अनेक ठिकाणी फुटपाथवरून दुचाकी व चारचाकी वाहने चालवण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड होते आणि अपघातांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने नागरी शिस्त आणि वाहतूक नियमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी परदेशी नागरिकांच्या कृतीचे कौतुक केले आहे. “फुटपाथ पायी चालणाऱ्यांसाठीच असतो,” असे म्हणत अनेकांनी वाहनचालकांच्या बेफिकीर वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी मात्र वाहतूक पोलिसांनी याकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे भारतातील ‘सिव्हिक सेन्स’ अर्थात नागरी शिस्तीबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे. नियमांची अंमलबजावणी, नागरिकांची जबाबदारी आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळण्याचे महत्त्व या मुद्द्यांवर हा व्हिडिओ एक महत्त्वाचा संदेश देत असल्याचे बोलले जात आहे.